येवला (नाशिक) - येवला तालुका पोलीस ठाण्यात काेट्यवधींची वाहने धूळ खात पडून असून वाहन मालकांनी पुढे येऊन आपापली वाहने ओळख पटवून घेऊन जावे, असे आवाहन पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
येवला तालुका पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे. नाशिक, औरंगाबाद, मालेगाव, शिर्डी, अहमदनगर या मोठ्या शहरांकडे जाणारे मार्ग येवल्यातून जात असल्याने अपघातांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अपघात झालेली, बेवारस मिळून आलेली, चोरट्यांकडून हस्तगत केलेली तसेच, विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेली लाखो रुपये किमतीची वाहने येवला तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात उभी असून यातील अनेक वाहनांना अक्षरशः गंज चढलेला आहे.
दुचाकी वाहनांची संख्या मोठी
यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. यातील शेकडो मोटारसायकलींना गंज चढलेला आहे. तर, अनेक वाहने वापराविना पडून असल्याने जवळपास निकामी होत आली आहेत. आता यातील बहुतांश वाहनांचे सुटे भागही दिसेनासे झाले आहेत.
वाहन मालक शाेधणे गरजेचे
येथे मोठ्या प्रमाणावर दुचाकींची संख्या असल्याने या गाड्यांच्या मालकांच्या शोधासाठी प्रयत्न करण्याची गरज असून पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा आवाहन करूनही वाहन मालक पुढे आलेले नाहीत. वाहन मालकांनी पुढे येऊन आपापली वाहने घेऊन गेल्यास पोलीस स्टेशनच्या आवारातील अडगळ कमी होण्यास मदत होणार आहे.