नाशिक : लग्नाच्या वऱ्हाडाची कार पुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातात बालिकेसह तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना नांदगाव मालेगाव मार्गावरील नाग्या साक्या धरणाच्या पुलावर सोमवारी मध्यरात्री घडली. या अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नांदगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाग्या-साक्या धरणाच्या पुलावरून कोसळली कार : नांदगाव -मालेगाव मार्गांवर नाग्या - साक्या धरणाच्या पुलावरून कार कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एका लहान बालिकेसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना नांदगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी असलेल्या काही नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. सर्व जण मालेगाव येथील असून जालन्याला लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परत जात असताना मध्यरात्री नंतर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
लग्नानंतर परतताना झाला अपघात : अपघात जखमी झालेले सगळे नागरिक मालेगाव येथील असून ते एका लग्नाला जालन्याला गेले होते. लग्न सोहळा आटोपून घरी परत जात असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. यात लहान मुलीसह तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याठिकाणी कायम अपघात होत असतात. त्यामुळे या ठिकाणी लाईट लावण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तीन नागरिकांचा अपघातात बळी गेल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
हेही वाचा -