नाशिक - जिल्ह्यात 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे आता मनमाड शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर 'तिसऱ्या डोळ्यां'ची नजर असणार आहे. मनमाड पोलीस ड्रोनच्या साहाय्याने शहरवासियांवर नजर ठेवणार आहेत.
तर ड्रोन कॅमेऱ्यात दिसणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. आज शहरातील शिवाजी चौक या भागात मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी ड्रोनची चाचणी घेतली.
संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत आहे. आपल्या देशात सध्या तरी तो आवाक्यात आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने 'जनता कर्फ्यू', 'लॉकडाऊन' यासारखे उपाय केले आहेत. मात्र, तरीही काहींना याचे अजिबात गांभीर्य नाही. ते विनाकारण बाहेर फिरत असतात, काही पोलिसांची नजर चुकवून पळून जातात, अशा महाभागांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्याचे ठरवले आहे.
शहरातील प्रमुख मार्गासह ठिकठिकाणी लागणाऱ्या बाजारात तसेच अधिक अडचणीच्या गल्लीत तिसऱ्या डोळ्याची मदत घेण्यात येणार आहे. तर बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले आहे.
मनमाड शहरात एकही कोरोना रुग्ण नाही. तसेच जिल्ह्यात एकाच रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, ही संख्या वाढू नये, म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून शहरात अनेक ठिकाणी लोकांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.