मनमाड (नाशिक) - विविध मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी आज (सोमवारी) संप पुकारला आहे. या संपात लासलगाव, मनमाड नांदगांव मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
'या' प्रमुख मागण्या -
- नाशिक जिल्ह्यातील लेव्हीचा प्रश्न मार्गी लावून लेव्हीची रक्कम बोर्डात भरण्यात यावी
- कांदा-बटाटा भाजीपाला व फळे मालावरील नियमण कायम करण्यात यावी
- नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट आवारातत मालाची आवक होऊन कामगारांना पुरेसे काम मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या
- राष्ट्रीयकृत बँका व पतपेढीकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची माथाडी बोर्डाकडून कपात न होण्याबाबत कामगार विभागाने काढलेला आदेश रद्द करण्यात यावा
या संपाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. संघटनेनेही वारंवार लाक्षणिक संप पुकारण्यापेक्षा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे, अशी मागणीही यावेळी कामगारांनी केली.
हेही वाचा - माथाडी कामगारांचा संप, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद; शेतकऱ्यांची मात्र अडचण
राज्यभरात बाजार समित्यांमध्ये आंदोलनाची झळ -
आज माथाडी व मापारी कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील सर्वच बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच सर्वच बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याने बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.