मनमाड (नाशिक) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदी व कडक निर्बंधामुळे अनेकांना एकवेळच्या जेवणाचे मुश्कील झाले आहे. मात्र, मनमाड येथील गुरुद्वारा येथे मागील अनेक वर्षांपासून गरजवंतांना दोन वेळचे जेवण देत आहेत. मनमाड गुरुद्वाराने या कोरोना काळातही ही परंपरा अविरत सुरूच ठेवली आहे. आजही दररोज 6 ते 7 हजार लोकांना दोन वेळचे जेवण देऊन माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
मनमाड गुरुद्वारा एक अन्नछत्र..!
मनमाड गुरुद्वारा अर्थात गुप्तसर साहीब म्हणजे एक अन्नछत्रच आहे. गेल्या 27 वर्षांपासून सुरू झालेले लंगर म्हणजे जेवण अद्याप सुरू आहे. कोरोना काळात झालेल्या टाळेबंदी व कडक निर्बंध यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजवंतांना मनमाड गुरुद्वारा अविरतपण लंगरच्या माध्यमातून जेवण देत आहेत.
रोज दिले जाते 6 ते 7 हजार नागरिकांना लंगर
कोरोना महामारीत अनेकांना रोज दोन वेळचे जेवण देऊन गुरुद्वाराने माणुसकी जिवंत ठेवली. टाळेबंदीच्या काळात रोज 10 ते 12 हजार नागरिकांना जेवण दिले जात होते. आजही दररोज 6 ते 7 हजार नागरिकांना जेवण दिले जात आहे.
गुरुद्वाराचे अनेक समाजपयोगी उपक्रम
मनमाड गुरुद्वाराने कोरोना महामारीत संपूर्ण शहरात औषध फवारणी करून शहराचे निर्जंतुकीकरण केले. तसेच आपापल्या घरी जाणाऱ्या अनेक परप्रांतिय मजुरांनाही त्यांनी लंगर वाटप केले. यासह विविध सामाजिक उपक्रम या गुरुद्वाराकडून केले जाते.
हेही वाचा - येवल्यात हिंदू कुटुंबांतील दोघी बहिणींनी केले रमजानचे रोजे