येवला (नाशिक) - येवला (Yeola) शहरामध्ये दुचाकीवरुन जात असलेल्या युवकाचा नायलॉन मांज्याने (Nylon Manja) गळा चिरून तो जखमी (Man seriously injured) झाला. या युवकाला 20 टाके पडले आहेत. कुमार मेघे असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. येवल्यातील शांतीपुष्प या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मांज्याने कापला गळा -
येवल्यातील पतंगोत्सवला आजपासून सुरुवात झाली आहे. या पतंगोत्सवात पहिल्याच दिवशी गालबोट लागले. कुमार मेघे हा युवक येवल्याकडून अंगणगावाकडे दुचाकीवर जात होता. यावेळी कटून आलेल्या पतंगाचा नायलॉन मांजा या युवकाच्या गळ्याला अडकल्याने युवकाचा गळा कापला. त्यावेळी त्याच्या गळ्यातून रक्तस्राव होत असल्याने स्थानिकांनी या युवकाला एका खासगी रुग्णालयात नेले. त्वरित या युवकावर उपचार केले असून त्याच्या गळ्याला 20 टाके पडले आहे. या युवकाची परिस्थिती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सर्रास नायलॉन मांजाचा वापर
नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरीदेखील येवला शहरांमध्ये अनेक पतंग शौकीन सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर करत असल्याने अशा घटना घडत आहेत. आता तरी या मांज्यावर बंदी आणावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.