नाशिक - येथील धार्मिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या तपोवन भागात एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.3 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनातील रामसृष्टी उद्यानात एका 40 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आल्याचे सकाळी या भागात काही नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी ह्याची माहिती पोलिसांना दिली. तत्काळ आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. संतोष पवार (रा. हर्सूल), असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे.
रविवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. यातील अज्ञात हल्लेखोरांच्या शोधार्थ गुन्हे शोध पथक रवाना झाले आहे. ही हत्या इथेच करण्यात आली की, हत्या दुसरीकडे करून मृतदेह येथे फेकण्यात आला आहे. याचा तपास देखील पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.