नाशिक - मुथूट फायनान्समध्ये 12 जूनला गोळीबार झाला होता. याप्रकरणी मुख्य संशयित जितेंद्र विजयबहादूर सिंह राजपुतला अटक केल्यानंतर आज सुरत येथील कलदोरा भागातून कुख्यात गुंड असलेला प्रेमेन्द्र सिंह राजपूतला गुन्हे शाखेच्या 7 जणांच्या पथकाने अटक केली. प्रेमेन्द्रने मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात गोळीबार करून सॅम्युअल साजू या कर्मचाऱ्याची हत्या केली होती.
प्रेमेन्द्रवर यापूर्वीही दरोडे आणि गोळीबार सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रेमेन्द्र सिंहने दरोड्यादरम्यान गौरव हे बनावट नाव वापरले होते, तसेच प्रेमेन्द्र सिंह हा उत्तर प्रदेशातील एका माजी मंत्र्याकडे पाच वर्षे कामाला असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सुबोध सिंह या कुख्यात गुन्हेगाराचा प्रेमेन्द्र सिंह हा माजी सहकारी आहे. ज्वेलरी थेप घालणारा सुबोध सिंह सध्या जेलमध्ये असून त्याच्याशी प्रेमेन्द्र सिंहचा जेलमध्ये संपर्क होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुथूट दरोडा प्रकरणात आत्तापर्यंत आरोपींची संख्या अकरा झाली असून त्यापैकी दोन मुख्य संशयितांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे.
उत्कृष्ट तपासामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तीन टीमला 2 लाख 10 हजार रुपयांचे बक्षीस पोलीस आयुक्तांनी जाहीर केले, मात्र पूर्ण रक्कम ही मुथूट गोळीबारातील मृत कर्मचारी सॅम्युअल साजू यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच इतर आरोपीपर्यंत पोहोचू असा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला आहे..