नाशिक - मनमाडसह, नांदगाव भागात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वच महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळलेली दिसत आहे. मनमाडच्या नागापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी यात्रा भरली. पुरातन असलेल्या या मंदिरात अनेक भाविकांनी दर्शन घेतले.
हर हर महादेव, बम-बम भोलेचा जयघोष करत आज मनमाडसह, येवला, चांदवड, मालेगाव, सटाणा, नांदगाव आदी भागात महाशिवरात्री पारंपारिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त अभिषेक पूजा, कावडी व तकतराव यांच्या भव्य मिरवणुकांसह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहर परिसरातील सर्वच मंदिरात दर्शनासाठी पहाटे पासून भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील पुरातन असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त वेगेवगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंचक्रोशीतील नागरिक आपल्या कुटुंबीयासह मोठ्या संख्येने यात्रेत उपस्थित झाले आहेत. येथे महाशिवरात्रीनिमित्त आदल्या दिवशी तमाशा आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली आहे.
हेही वाचा - नाशिमध्ये अंघोळीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा सीता सरोवरात बुडून मृत्यू
मनमाडनजिक असलेल्या नागापूर येथील हे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. याठिकाणी कायम पाणी असते. सकाळी आणि संध्याकाळी हे पाणी मोटारीच्या साह्याने काढले जाते. शेकडो वर्षापासून येथे यात्रा भरते. नाशिक जिल्ह्यातील दुसरा क्रमांक असलेली ही यात्रा म्हणून नागापूरची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
हेही वाचा - वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरू करणार - राजेश टोपे