नाशिक : राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली सभा ही छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदार संघात होणार आहे. शनिवारी दुपारी येवला बाजार समितीच्या पटांगणात ही सभा होणार असून शरद पवार कधीकाळी त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले छगन भुजबळ यांच्या विरोधात काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे.
पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीतच राहत भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात भूकंप घडला. शिवाय अजित पवार यांनी पक्षासह चिन्हावरही दावा ठोकला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही संघर्षाचा पवित्रा घेतल्याने दोन्ही गट आमनेसामने भिडले आहेत. शरद पवार यांनी या बंडाचे आव्हान परतून लावण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात बंडखोर व कधीकाळी अती विश्वासू छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून होणार आहे. शनिवारी येवला बाजार समितीच्या पटांगणात दुपारी ही सभा होईल. छगन भुजबळांसह बडखोरांचा ते कसा समाचार घेतात, याकडे अजित पवार गटासह राज्याचे लक्ष लागले आहे.
दौरा रद्द झाल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली सभा उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात होणार आहे. मात्र शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांचा नाशिक दौरा नियोजित असून भुजबळांच्या मतदार संघात सभा होणार आहे. त्यांचा दौरा रद्द झाल्याची अफवा काही खोडसाळ प्रवृत्तीकडून पसरवली जात असल्याचा आरोपही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पावसाचा अंदाज घेऊन जाहीर होईल जळगाव दौरा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा त्यांनी मुंबईत केली आहे. राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार हे येवला येथे फोडणार आहेत. शनिवारी सायंकाळी 4 वाजता येवला येथे शरद पवार यांची ऐतिहासिक सभा होणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे. धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होईल, असे ट्विट देखील राष्ट्रवादीने केले आहे.
हेही वाचा -