मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठा राज्यात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसमध्ये केलेल्या या बंडखोरीने वरिष्ठ स्तरावर तांबे विरोधात मोठी नाराजी पसरली आहे. पक्षांतर्गत केलेल्या कारवाईमुळे तांबेवर निलंबनाची कारवाई तर सत्यजित तांबे यांच्याकडील युवक अध्यक्षपद काढून घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
कॉंग्रेसची हायकमांडकडे मागणी : नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याऐवजी सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरून महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचे जाहीर केले. नाशिकमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीनेही तांबेंच्या परस्पर कारवायाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केले. काँग्रेसच्या दिल्ली स्तरावर या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सुधीर तांबे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. मात्र युवक सचिव अध्यक्ष असलेल्या सत्यजीत तांबे यांच्याबाबत कोणतेही भूमिका घेतली नव्हती. काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत दिल्लीच्या स्तरावर कारवाईची मागणी लावून धरल्यानंतर आज सत्यजीत तांबेंवर कारवाईचे आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
युवक अध्यक्ष पद काढणार ? : सत्यजीत तांबे यांच्याकडे काँग्रेसच्या युवक अध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. सत्यजीत तांबे यांच्या नियुक्तीनंतर ते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असल्याने निवड केल्याचा आरोप झाला होता. युवकांनी सत्यजीत तांबे यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे वारंवार सांगितले जात होते. हा वाद अंतर्गत धुमसत असताना शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीने चिघळला आहे. तांब्यांवर थेट कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले होते. काँग्रेसचे नेते एच के पाटील यांनी या चौकशीचा अहवाल मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला असून त्यांनी अहवालानंतर सत्यजित तांबे यांच्याकडून युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्यांना पक्षातून निलंबित ही केले जावे, असे आदेश देखील पाटील यांना दिल्याचे समजते.
नाट्यमय घडामोडी : सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. नाशिकच्या जागेसाठी शिवसेनेने नागपूरची जागा सोडली. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात काटे की टक्कर होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुभांगी पाटील या नॉटरीचेबल झाल्या. तसेच पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा रंगली. तर्क वितर्क यामुळे वाढले होते. सकाळ पासूनच पाटील या संपर्काच्या बाहेर राहिल्याने महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.