नाशिक - येथील काळाराम मंदिराचे पुजारी आणि निर्वाणी आखाडाचे महंत सुधीर दास महाराज यांनी सरकारवर या विषयावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, 2 जैन मंदिरांच्या ऐवजी 1 जैन आणि 1 हिंदू मंदिर उघडण्यास परवानगी का नाही मागितली? रस्त्यांवर लाखोंची गर्दी असताना सरकारला फक्त हिंदू मंदिरांमध्येच कोरोना दिसतोय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उच्च न्यायालयाने बुधवारी 125 जैन मंदिरांपैकी 2 मंदिरांना दिवाळीपूर्वी उघडण्यास परवानगी दिल्यानंतर साधू महंतांनी यावर आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्र शासन न्यायालयात बाजू मांडण्यास कमी पडल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - ठाण्यात बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेचे भजन-किर्तन आंदोलन, मंदिरे उघडण्याची मागणी
हिंदू मंदिर उघडण्याकरता मुख्यमंत्री यांना वारंवार विनंती केली. मात्र, त्यांनी उघडण्याची परवानगी दिली नाही. शहरांमध्ये सण, उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मग मंदिर उघडल्याने कोरोना वाढणार आहे का? असा प्रश्नही महंत देविदास यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सर्व संत महात्म्यांना बोलवून दिवाळीच्या आधी सर्व मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्य शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत.