नाशिक - शेत जमिनीचे हिस्से वाटप प्रकरण पूर्ण करून देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पेठ येथील नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत बाळासाहेब भाऊराव नवले या नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडले असून ग्रामस्थांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीवरून, तक्रारदाराने आपल्या वडिलोपार्जीत जमिनीच्या हिस्से वाटपासाठीचे प्रकरण पेठ येथील तहसील कार्यालयात पाठवले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी नायब तहसीलदार नवले याने तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने ह्या संदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचत पेठ येथील तहसील कार्यालयाच्या आवरात सहा हजार रुपयांची लाच घेताना नवले याला रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- नाशकात दोन दिवसात तीन विनयभंगाचे प्रकार; महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर