नाशिक : सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असून; राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली लॉन्ग मार्च मोर्चा अधिवेशनावर काढण्यात आला. काल दिंडोरी पासून या लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरा हा मोर्चा नाशिक मध्ये दाखल झालेला आहे. आणि आता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. मोर्चा रोखण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र मोर्चेकरी आंदोलनावर ठाम असल्याने त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. तब्बल आठ दिवसांचा पायी प्रवास करत शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत. 21 मार्चला आदिवासी शेतकरी मुंबईत दाखल होणार आहेत. शेतमालाचे पडलेले भाव आणि हक्काच्या वन जमिनी आदिवासी शेतकऱ्यांना मिळाव्यात, या मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला आहे.
राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी केलेल्या विविध मागण्या पुढील प्रमाणे आहेत :
- कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करा, कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या.
- शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा. शेतीला लागणारी वीज दिवसा सलग 12 तास उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांचे शेती विषयक संपूर्ण कर्ज माफ करून सात बारा कोरा करा.
- शेती कसणाऱ्यांच्या ताब्यात असलेली 4 हेक्टर पर्यंतची वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे करुन द्यावी.
- ज्या गायरान, गावठाण व सरकारी जमिनीवर घरे आहेत, ती घरे व घराची तळ जमीन राहात असणाराच्या नावे करा.
- पीक विमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमा धारकांना नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडा.
- अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एन.डी.आर.एफ.मधून तत्काळ भरपाई दया.
- 2020 च्या निसर्ग चक्रीवादळी पावसात हिरडा पिकाच्या नुकसानीच्या झालेल्या पंचानाम्यांच्या आधारे शेतकऱ्यांना देय असलेली भरपाई तत्काळ दया.
- गायीच्या दुधाला किमान 47 रुपये आणि म्हशीच्या दुधाला किमान 67 रुपये भाव दया.
- महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केरळच्या धर्तीवर मोबदला दया. योग्य पुनर्वसन करा.
- अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर, ग्रामरोजगार सेवक अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतन श्रेणी लागू करा.
- बोगस लाभार्थीना नोकरीवरून कमी करून; त्या जागांवर खऱ्या आदिवासींना घ्या व आदिवासींच्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरा.
हेही वाचा : Strike for Old Pension : उद्यापासून जुन्या पेन्शनसाठी 5 लाख शिक्षक संपावर, परिक्षेवर संपाचे सावट