नाशिक - कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येऊन लॉकडाऊनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. काही जिल्ह्यात अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध कायम आहेत. त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील विकेंड लाॅकडाऊन शिथील करणे व इतर दिवस दुकानांची वेळ वाढविणे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय टास्कफोर्स घेणार असून तो निर्णय नाशिक जिल्ह्यासाठी बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील सध्याचे निर्बंध अद्याप कायम राहणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या टास्क फोर्समार्फत निर्बंधांच्या शिथिलतेबाबत घेण्यात येणारा निर्णय अंतिम असेल, त्या निर्णयाच्या अनुषंगानेच जिल्हास्तरावर सर्व नियम लागू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटणाऱ्या रुग्णसंख्या दिलासादायक आहे. परंतू संसर्गाची भिती अद्यापही पूर्णत: संपलेली नसल्याने सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
![कोरोना आढावा बैठकी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-yeolabhujbalmeting-mhc10071_30072021162621_3007f_1627642581_976.jpg)
एक ऑर्डर काढली की सगळं सुरू होईल, पण नंतर परिस्थिती बिघडेल..
अमेरिकेत रुग्णसंख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. केरळात रुग्णसंख्या वाढत असून तेथे दोन दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अजून धोका टळलेला नाही. एक ऑर्डर काढली की सगळं सुरू होईल. पण नंतर परिस्थिती अवघड होईलष अशी भितीही भुजबळ यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारपण निर्बंध कडक करा असा सल्ला देत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत माॅल, महाविद्यालये सुरू करणे, दुकानांची वेळ वाढविणे याबाबत चर्चा झाली. टास्क फोर्सचा निर्णय येईल त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात निर्णय घेतले जातील. मुख्यमंत्र्यांकडून जे आदेश येतील त्याचे पालन केले जाईल. निर्बंधात शिथिलता टास्क फोर्स देऊ शकते. पण जिल्ह्याच्या दृष्टीने त्यास मुभा द्यायची किंवा बंधन कायम ठेवायचे, हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात पाच तालुके कोरोना मुक्तिकडे वाटचाल करत आहे. इगतपुरित ४, कळवणमध्ये ७, पेठमध्ये १, त्र्यंबकमध्ये ३ करोना पाॅझिटिव्ह रुग्ण असून सुरगाण्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्याला पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसी उपलब्ध झाल्यास त्याअनुषंगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मीती करणाऱ्या एकूण 25 ऑक्सिजन प्रकल्पांची साधन सामुग्री प्राप्त झाली असून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांसोबत बैठक घेवून नियोजन करावे, असे बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात 18 लाख लोकांचे लसीकरण झाले...
जिल्ह्यात आतापर्यंत 25 टक्के म्हणजेच साधारण 18 लाख 30 हजार 27 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकोसीसच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून आजअखेर 58 रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना गरजेचे असणारे इंजेक्शन देखील आवश्यकत्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 2 टक्के असून मृत्यूदर 2.11 टक्के आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या शाळांपैकी आजपर्यंत 277 शाळा सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
![आर्थिक मदतीचे वाटप](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-yeolabhujbalmeting-mhc10071_30072021162621_3007f_1627642581_218.jpg)
रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी नको-
कोरोना रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी न देता थेट रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ऑक्सिजन प्लँट त्वरित कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच खरीप हंगामा करिता खतांच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच खतांचा साठा मुबलक प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिले. याचबरोबर येवला तालुक्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदतीचे वाटप यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते धनादेश देऊन करण्यात आले.
कोरोना योद्ध्यांचा सन्मान....
कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणाऱ्या निफाड तालुक्यातील युवकांचा सन्मान करून त्यांचे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी अभिनंदन केले.