नाशिक - त्र्यंबकेश्वर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. छुप्या पद्धतीने या बनावट मध्य साठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या वाहनांचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत ही कारवाई केली.
हेही वाचा - युतीत 50-50 फॉर्म्युला ठरला नाही; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला
याप्रकरणी किशनलाल मनोहरलाल किर (वय-21वर्षे) त्याचा साथीदार कमलेश मोहनलालजी नाई (वय-24 वर्षे दोघेही रा. राजसमन्द, राज्य-राजस्थान) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडुन मद्यसाठा अवैध वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 9 लाख 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा मद्यसाठा लपवण्यासाठी आरोपींनी वाहनाच्या पाठीमागील डिक्कीच्या खाली चोरकप्पा तयार केला होता.
हेही वाचा - नाशिकच्या लष्करी जवानाचा जामनगर येथे अंगावर वीज पडून मृत्यू
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली चेकपोस्ट या ठिकाणी सापळा लावून (एमएच-04-जेयु-3618) क्रमांकाची पिकअपची तपासणी केली असता, सदर गाडीमध्ये केवळ दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या दारूच्या 750 मिलीच्या 288 व 180 मिलीच्या 284 बाटल्या मिळाल्या.