नाशिक - दिंडोरी तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या गांडोळे येथे गावातील शिक्षणप्रेमी युवकांच्या मदतीने शिक्षकांनी वाचनालय सुरू केले आहे. दुर्गम भागात पोहोचवलेल्या या सुविधेमुळे शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. मात्र, दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग अतिशय दुर्गम व आदिवासी लोकवस्तीचा आहे. येथे मोबाइल टॉवर नसल्याने इंटरनेट सेवा पुरेशी नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. जिल्हा परिषद गांडोळे शाळेच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गावातील शिक्षण प्रेमी युवकांशी संवाद साधत विद्यार्थी वाचनालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनराज भोये यांच्या सहकार्याने मोहन जाधव यांनी स्वत:च्या घराची एक खोली विद्यार्थी वाचनालयासाठी उपलब्ध करून दिली.
येथे शाळेतील क्रमिक अभ्यासक्रमासह गोष्टी, महापुरुषांची चरित्रे, शैक्षणिक मासिके व गावातील पालकांनी दान केलेली शालोपयोगी पुस्तके ठेवण्यात आली आहेत, तर मोहन जाधव हे स्वतःचा दूरदर्शन संच देखील वाचनालयासाठी वापरतात. तसेच आकाशवाणी संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते.वाचनालयात शारीरिक अंतर ठेवून विदयार्थ्यांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले असून वेळोवेळी वाचनालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.
शिक्षकांनी वर्गनिहाय वेळापत्रक तयार केले असून एका वेळेस केवळ १२ ते १५ विद्यार्थ्यांना एक तासासाठी प्रवेश देण्यात येतो. मार्गदर्शनासाठी शिक्षक वाचनालयात उपस्थित राहतात. शाळेच्या या उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी भास्कर कनोज, शिक्षणविस्तार अधिकारी सुनिता आहिरे, केंद्र प्रमुख नामदेवराव गायकवाड यांनी कौतुक केले आहे. वाचनालयाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भगवंत भोये, छबू प्रधान, मधुकर सहाळे, लिला भोये, प्रल्हाद पवार व सचिन भामरे प्रयत्न करत आहेत.