नाशिक - दुडगाव शिवारात (ता. नाशिक) एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला असून वन विभागाच्या वतीने या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हेही वाचा - रत्नागिरी : वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक जिल्ह्यात वर्षभरात बिबट्याच्या हल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असुन 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटे या गावात बुधवारी एका शेतकऱ्याच्या घरात ठाण मांडून बसलेला बिबट्या जेरबंद झाल्याची घटना ताजी असताना नाशिक शहराजवळ असलेल्या दुडगाव शिवारात आणखी एका बिबट्याला कैद करण्यात वन विभागाला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.काही दिवसांपासून महिरवणी गावाजवळ असलेल्या दुडगाव शिवारात शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. दरम्यान, याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यामध्ये बुधवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे.
दुडगाव परिसरात अनेक बिबटे असल्याने कायमस्वरूपी पिंजरा लावावा - स्थानिकांची मागणी
दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र, या ठिकाणी आणखी बिबटे असण्याची शक्यता लक्षात घेता दुडगाव शिवारात कायमस्वरूपी पिंजरा तैनात करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेला बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. गेल्या वर्षभरात नाशिक विभागात 13 बिबटे वन विभागाला जेरबंद करण्यात यश आले आहे.
हेही वाचा - कराडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी, शोध सुरू