नाशिक : जुनी बेज भागात राहणारे शेतकरी पोपट पवार यांच्या ऊसाच्या शेतालगत ठेवण्यात आलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यात शिकार करताना चक्क बिबट्याच अडकला. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत वन विभाग अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर वन विभागाने कोंबड्याच्या खुराड्यासहित बिबट्याला घेऊन गेले.
दोन ते तीन बिबट्यांचा वावर : कळवण जुनी बेज भागात ऊसाची शेती आहे. सध्या ऊस पाच ते सहा फूट उंच झाला आहे. या ठिकाणी नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. अशात शेतालगत शेतकऱ्याने कोंबड्यांसाठी खुराडे ठेवले आहे. आज सकाळी शेतकऱ्याने बघितले तेव्हा त्या खुराड्यात बिबट्या अडकलेला आढळला. याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी खुराड्यासहित बिबट्याला उचलून नेले. कळवण तालुक्यातील जुनी बेज भागात अजूनही दोन ते तीन बिबट्यांचा वावर आहे. वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी पोपट पवार यांनी केली आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा ठरते. बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असतात. यामुळे बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या बिबट्यांना लपण्यासाठीही चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस यासारखे वन्यप्राणी जवळ येणार नाहीत. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
हेही वाचा: