नाशिक - शहराच्या विविध भागात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी 12 मे ला मध्यरात्री नाशिकरोड भागातील सौभाग्य नगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाला निवेदन देत पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या मेरी परिसरातील नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या कॅन्सर रुग्णालयाच्या दरवाज्याजवळ बिबट्या दिसला होता. त्यानंतर आता परत एकदा सौभाग्य नगरमध्ये बिबट्या आढळला आहे.
नाशिक जिल्ह्याची कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळख आहे. येथे द्राक्ष, कांदा, मका यासोबतच उसाचे देखील मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन विभागाने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्व्हेक्षणात नाशिक जिल्ह्यात 226 बिबटे असल्याचे समोर आलं आहे. यामध्ये सर्वाधिक बिबटे हे गोदावरी, दारणा आणि कदवा नदी किनाऱ्याच्या ऊस क्षेत्रात असल्याचे आढळून आले आहे.
मागील काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात सातत्याने भक्ष्याच्या शोधत बिबट्या मानवी वस्तीत येत असून बिबट्यांचे नागरिकांवर होणारे हल्ले वाढले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांची संख्या इगतपुरी, निफाड, सिन्नर आणि दिंडोरी या तालुक्यात आहे. या भागात नदी किनारी मुबलक पाणी, लपण्यासाठी उसाचे शेत असल्याने येथे बिबट्यांची संख्या जास्त आहे. तसेच गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातामध्ये 36 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.