नाशिक - सध्या दारणाकाठी आणि देवळाली कॅम्पच्या नागरी वस्तीमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्या आणि त्याचे बछडे मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या दहा दिवसांत सामनगाव परिसरातून दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. असे असले तरी आता देवळाली कॅम्पच्या नागरी वस्ती भागात आणि दारणाकाठच्या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. कॅम्प परिसरातील वेस्टन रोडवरील लष्करी वर्कशॉप परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट आपल्या दोन बछड्यांसह मुक्त संचार करत असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत.
दरम्यान, बनात चाळच्या जवळच नागझिरा नाला आहे. तसेच वन विभागाचे सुमारे हजार एकरावरील मोकळे जंगल आहे. त्यामुळे हा परिसर बिबट्याला लपण्यासाठी सोयीस्कर असल्याने या भागात बिबट्याचा वावर वाढत आहे. दरम्यान, आता लष्करी वर्कशॉप परिसरात बिबट्या आढळून आल्याने बनात चाळ परिसरात वन विभागाने पिंजरा लावून या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.