नाशिक - शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे. रविवार सायंकाळच्या सुमारास सामनगाव रोडच्या पाटील मळ्यात पुन्हा बिबट्याने साडे चार वर्षीय चिमुरड्यावर हल्ला करून जखमी केले. ओम कडभाने असे या चिमुरड्याचे नाव आहे. या हल्ल्यात ओमच्या मानेला गंभीर जखम झाली असून त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून या बिबट्याने तीन जणांचा बळीही घेतला आहे. वनविभागाचे पथक या बिबट्याचा मागावर आहेत. मात्र, अजूनही बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. रविवारी सायंकाळी चिमुरड्यावर हल्ला झाल्याच्या अवघ्या दोन तासानंतर सामनगाव नजीकच काही नागरिकांना मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी बिबट्याला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला तत्काळ जेरबंद करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वनविभागाला केली आहे.
बारा दिवसात बिबट्याच्या दुसरा हल्ला...
११ जूनरोजी गुंजन नेहरे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. ही घटना नाशिक शहराजवळच असलेल्या बाभळेश्वर गावात घडली होती. या घटनेला बारा दिवस पूर्ण होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने चार वर्षाच्या ओमवर हल्ला चढविला आहे. यामुळे पसिरात बिबट्याची कमालीची दहशत पसरली आहे.