नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या जानोरी (नाशिक विमानतळ) या ठिकाणाहून बाबुराव बोस यांनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या शेतामध्ये शेवंती, गुलाब, द्राक्ष आदी पिकांच्या झालेल्या नुकसानामुळे अतिशय गंभीर अवस्था झाली असल्याची बाब 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
बाबुराव बोस यांनी सांगितले, गेल्या चार वर्षांपासून ते, पत्नी निर्मला बोस आणि घरातील परिवार मजूर या सर्वांना घेऊन शेती करतात. त्यांचा शेतात द्राक्ष, गुलाब, शिमला मिरची, शेवंती, यांसारखी विविध पिकांची शेती केली जाते. परंतु मागील काळात नोटबंदीचा फटका त्यानंतर अतिपाऊस नंतर पून्हा अवर्षण व आता कोरोनाया रोगाचा प्रादुर्भावाचा फटका बसला. यामुळे, देश-विदेशात तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यात जाणारी आमची शेवंती, गुलाब, द्राक्ष, यासारख्या पिकांची मार्केटिंग व्यवस्था पूर्णत: बंद पडली. यामुळे, तयार झालेलया फुलांचा माल कुठे पाठवायचा व तो घेण्यासाठी कोण घराच्या बाहेर निघणार हा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित राहिला.
त्यातच, या रोगाला प्रतिकार म्हणून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याने कोणताही नागरिक किंवा व्यापारी घराबाहेर पडणार नाही. फुले तोडणीला आली आहेत मात्र, व्यापारीपेठ सर्व मंदिरे बंद असल्यामुळे फुलांना उठाव नाही. तसेच फूलशेती तयार करण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतात आलेल्या या पिकाचे 100 टक्के नुकसान झाले असल्यामुळे त्यांनी एका शेतातील शेवंतीवर ट्रॅक्टरने नांगरणी करुन टाकली. तर, आता शेतावर असलेल्या मजुरांचा उदरनिर्वाह कशाप्रकारे भागवायचा या विवंचनेत हा शेतकरी सापडला आहे.