नाशिक: शहरामध्ये सध्या गुंडाराज असल्याचे चित्र आहे. चोरी, मारहाण, गोळीबार, खून अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या अंबड भागात एका कंपनीच्या सीईओची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एका शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी रोडवरील एका खासगी विद्यालयात दहावीचा पेपर सुटल्यानंतर हा विद्यार्थी मित्रांसोबत घरी जात होता. यादरम्यान आठ ते दहा जणांकडून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. यात त्याच्या कानाला दुखापत झाली. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालकांची चिंता वाढली: मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिंडोरी रोडवरील विद्यालयात ही घटना घडली आहे. विद्यार्थ्याचे नाव ओम शिंदे आहे. हल्ल्यात त्याच्या कानाला दुखापत झाली. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर दोन विद्यार्थीही किरकोळ जखमी झाले आहेत. मुलाचे काही दिवसां अगोदर वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. शाळकरी मुलावर देखील आता कोयत्यांना हल्ला होत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
अल्पवयीन मुलांकडून हल्ला? राज्यातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीचे लोन अल्पवयीन मुलांपर्यंत येऊन ठेपले आहे. किरकोळ कारणातून शाळकरी मुलांमध्ये हाणामारीच्या घडत आहेत. याआधी देखील बऱ्याच शाळांमध्ये अशा घटना घडल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शाळा प्रशासन तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांचे समुपदेशन होण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुण्यातही विद्यार्थ्यावर हल्ला: प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाल्याची घटना पुण्यात 31 जानेवारी, 2023 रोजी घडली होती. यामध्ये एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. यात अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत वाढत चालली आहे. पोलिसांकडून कॉम्बीग ऑपरेशन करून अनेक आरोपींना अटक देखील करण्यात आले आहे. असे असताना देखील शहरात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही.
विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार: पुण्यातील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला होता. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला होता. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा: Salman Khan Threaten Case : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई