नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी आद्यपीठ असणाऱ्या सप्तशृंगी देवीची कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त रविवारी सकाळी महापुजा करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वर, असलोद, शहादा, सुरत, पेठ येथून तीर्थ कावडीने आणून भगवतीला स्नान घालण्यात आले. संपूर्ण राज्यातून भाविक कोजागिरी पौर्णिमेला गडावर हजेरी लावत असल्यामुळे सकाळी तीन वाजल्यापासूनच मंदिर गाभाऱ्यापासुन ते बाजारपेठेपर्यंत दर्शनासाठी रांग लागली होती.
संपूर्ण राज्यातून तृतीयपंथी सप्तश्रुंगी गडावर आल्यामुळे गड गजबजून गेला होता. त्यांनी शिवालय तलावावर स्नान करून मुख्य तृतीय पंथीयांना कडूनिंबाचा पाला बांधून भगवतीच्या प्रतिमेला विविध अलंकारांनी सजवून तिची सहवाद्य भव्य मिरवणूक काढली. यावेळी लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी झाले. शारदीय नवरात्रीपासून सुरू होणाऱ्या उत्सवाची कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सांगता होत असल्याचे भाविक सांगत आहेत.
हेही वाचा - बंगाली समाजाकडून दुर्गादेवीचे जल्लोषात विसर्जन
सुनिल बागुल, सुधिर सोनवणे यांच्या हस्ते ही पुजा करण्यात आली. यावेळी देवीचे पुजारी दिंगबर भोये, गोविंद केवारे, नाना गांगर्डे, प्रकाश कनोज, विश्वनाथ बर्डे, गौरव देशमुख, मिलिंद राजेंद्र दिक्षीत, भाग्येश दिक्षीत, विकी दिक्षीत, पुजारी विनोद दिक्षीत, घनश्याम दिक्षीत, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, उपसरपंच राजेंद्र गवळी, प्रशांत निकम, किरण राजपूत यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
हेही वाचा - नाशकात दसऱ्यानिमित्त ५१ फूट उंच रावण प्रतिमेचे दहन