नाशिक : नाशिकच्या जेलरोड परिसरातील विपुल बागुल हे रात्री शतपावली करत त्यांच्यावर हल्ला झाला आहे. अचानक त्यांचा मामेभाऊ निखिल मोरे आणि त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी विपुलवर चाकूने काही वार केले. याशिवाय एका हॉटेलवर दगडफेक केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे.
काय आहे कारण : जखमी विपुल बागुल याने आपला मामेभाऊ निखिल मोरे यांच्या वाहनांच्या कर्जाचे हप्ते भरले होते. त्या पैशांची मागणी विपुल याने केली होती. निखिल मोरे आणि त्याच्या बहिणीकडे विपुलने पैशाची मागणी केली होती. त्याचा राग मनात धरून मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन चाकूने हल्ला केला आहे. जखमी विपुल बागुल याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक शहरात वाढत्या घटना : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. खून, चोरी तसेच सर्रासपणे चाकू, कोयते आणि पिस्तूलचा वापर होत असल्याने नाशिक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूसाठी पैसे मागितले म्हणून राग आल्याने दोन अल्पवयीन मुलांनी एकाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली होती.
साताऱ्यातील घटना : वाढे फाटा येथील एका हॉटेल परिसरातील पान टपरीजवळ 23 जानेवारीला सोमवारी मध्यरात्री एका ३८ वर्षीय तरूणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अमित भोसले राहणार शुक्रवार पेठ असे खून झालेल्या तरूणाचे नाव होते. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी ही हत्या केल्याची माहिती समोर येत असून मारेकरी फरार झाले होते. अमित भोसले हा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. अमित हा नाश्ता करण्यासाठी थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्याच्यावर चार राऊंड फायर केले होते. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे आणि सातारा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सातारा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अमित भोसले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला होता.