नाशिक - दिंडोरी तहसील कार्यालयासमोर किसान सभेने काल बिर्हाड आंदोलन सुरू केले असून त्यामुळे तहसीलच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. हे आंदोलन आजही सुरू असून किसान सभेच्या सभासदांनी तहसील कार्यालया समोरच ठाण मांडले आहे.
दिंडोरी बाजार समितीच्या कार्यालयापासून किसान सभेच्या सभासदांनी मोर्चास सुरुवात केली. मोर्चात सरकारविरुद्ध घोषणबाजी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरांनी दिंडोरी-नाशिक रस्ता पूर्णत: व्यापून टाकला होता. मोर्चामुळे जवळपास ३० ते ४० मिनिट वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले होते.
मोर्चादरम्यान वनाधिकार कायद्यनुसार कलम १९ मध्ये सुचविलेल्या पुराव्यातील दाव्यासोबत दोन पुरावे सादर केलेल्या दावेदारांचे दावे मंजूर करणे, मंजूर दावेदारांच्या ताब्यातील ४ हेक्टर पर्यंतची वन जमीन मंजूर करून ७ य १२ ला खातेदारी सादरी नोंद करणे, गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावी करणे, पात्र-अपात्र दावेदारांच्या गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे, नवीन रेशन कार्ड, विभक्त रेशनकार्ड त्वरित देणे, जीर्ण झालेले रेशन कार्ड त्वरित नवीन करूण देणे, वयोवृद्ध व विधवांना दरमाह १००० रुपये पेन्शन देणे, पंतप्रधान घरकूल आवास योजनेच्या लाभधारकांना ‘ब’ या हक्काच्या घरकुलाचे हफ्ते त्वरित देणे व ‘ड’ घरकुलाच्या यादीला मान्यता देऊन ऑनलाईन करणे यासही आदी मांगण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
मोर्चात सुनील मालसुरे, रमेश चौधरी, अशोक उफाडे, लक्ष्मीबाई काळे, तुळसाबाई गांगोडे, अंबादास सोनवणे, आप्पा वटाणे, श्रीराम पवार, देवीदास वाघ आदींनी मार्गदर्शन केले. र्मोर्चेकर्यांच्या मागण्यांबद्दल तहसील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. तो पर्यंत जवळपास हजार मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर घेराव केला होता. सायंकाळी ८ वाजेपर्यंत मोर्चेकरी तहसील आवारात तळ ठोकून होते. मोर्चेकर्यांसाठी विद्युत रोषणाईची नंतर सुविधा करण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विशेष सुरक्षा दलाचे जवानही बंदोबस्ताकरिता तैनात होते. डॉ.संदिप आहेर, तहसीलदार कैलास पवार, उप विभागीय पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी मोर्चेकर्यांशी चर्चा सुरू ठेवली आहे. याप्रसंगी तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी, तालुका कमिटी सदस्य समाधान सोमासे, रमेश चतूर, आप्पा वाटाणे, लक्ष्मीबाई काळे, शिवाजी गाढवे व तालुक्यातील किसान सभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा- महिला सुरक्षिततेसाठी 8 मार्चला नाशिक पोलिसांची 'निर्भया मॅरेथॉन'