पेठ (नाशिक) - कोरोना महामारीच्या काळात खावटी योजनेअंतर्गत आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देण्याचे जाहीर करून ते अद्याप आदिवासी नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. या विरोधात श्रमजीवी संघटनेने पेठ तहसीलवर मोर्चा काढत आदिवासी मंत्र्यांना कंदमुळे दिवाळी भेट म्हणून दिली.
कोरोना काळात करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे वड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशात आदिवासीमंत्री के. सी. पाडवी यांनी गरीब आदिवासी नागरिकांना खावटी योजनेअंतर्गत मदत देण्यास 9 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र, तरी सुद्धा कुठल्याही आदिवासी कुटुंबाला आर्थिकमदत व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप झाले नसून त्यांच्यावर ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. सरकार फक्त फसवी घोषणा करून गरीब आदिवासी नागरिकांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने पालघर, रायगड, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदारांना खावटी कंदमुळे भेट म्हणून देत आहे. ही भेट आदिवासी मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती आदिवासी बांधवांनी केली. लवकरात लवकर आदिवासी नागरिकांना खावटी योजनेचा लाभ मिळाला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.
आदिवासी मंत्र्यांना ही खावटी भेट
आता भुकेचा प्रश्न कमी झाला असून निसर्गाने नेहमीच आम्हाला जगायचे शिकवले आहे, असे म्हणत कंदमुळे, वरई, भात, नागली, चवळी, सुरण आणि याच वनजमिनीतून पिकवलेले धान्य आम्ही आदिवासी मंत्री के सी पाडवी यांना भेट म्हणून पाठवत असल्याचे आदिवासी नागरिकांनी सांगितले.