नाशिक(दिंडोरी)- तालुक्यातील लखमापुरा पश्चिम भागात काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. तर उमराळे परिसरात भयानक गारपीट होऊन जम्मू-काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली. या प्रकाराने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
उमराळे परिसरात झालेली गारपीट सामान्य नव्हती. अचानक सुरू झालेल्या गारपीटीमुळे जमिनीवर काही क्षणातच बर्फाचा मोठा थर जमा झाला. अगोदरच कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. शेतात असलेले द्राक्ष, कांदा, भाजीपाला ही पिके शेतातचं पडून खराब झाली आहेत.
आता लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपला माल मार्केटमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता परत निसर्गाने जोरदार दणका दिला आहे. या प्रकाराने बळीराजा पूर्णत: खचला असून आगामी काळात उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्याला सतावत आहे.