नाशिक - लोकसभा निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी छावा क्रांतीवीर सेनेचे उमेदवार करण गायकर यांनी माघार घेतली आहे. शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सांगत त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चा आणि सुकाणू समितीमधील सदस्य करण गायकर यांनी छावा क्रांतीवीर सेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गायकर यांनी मतदारसंघात अनेक मेळावे, बैठका घेऊन प्रचारास जोर धरला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारा युवानेता म्हणून त्यांना मतदारांची सहानभूती मिळत असल्याचे दिसत होते. एका शेतकरी कुटुंबातील मुलगा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे म्हणत शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्याचा चंग त्यांनी बांधला होता. मात्र, त्यांनी आपली भूमिका बदलत निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
यावेळी गायकर यांच्यासोबत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, भाजप पदाधिकारी सुनील बागुल, उध्दव निमसे उपस्थित होते. शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्याशी घरगुती संबंध असल्याचे सांगून त्यांनी निवडणूकीतून माघार घेत गोडसे यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे जाहीर केले,तसेच गोडसे यांनी देखील गायकर ह्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय सुकर होईल असे म्हटले आहे.