नाशिक - नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. जगात स्त्री ही देवीचा अंश आहे, अशी मान्यता आहे. म्हणून नवरात्रीत 2 ते 10 वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पुजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांच्या पायांचे पूजन करून त्यांना जेवण आणि भेटवस्तू देण्याची प्रथा असते.
कसे करावे कन्या पूजन -
2 ते 10 वर्षांच्या मुलींचे कन्या पूजन करावे. कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. कपाळावर हळदी, कुंकू लावावे. त्यानंतर त्यांना जेवण आणि भेटवस्तू द्यावी. शेवटी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावे.
काय लाभ होतो -
कन्या पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते, दारिद्र दूर होते, राजयोग प्राप्त होते, कुटुंबात सुख-समृद्धी नांदते, घरात कल्याण होते, आरोग्य चांगले राहते, विजय प्राप्त होते, शत्रूंचा नाश होतो अशी समज आहे.
दरवर्षी कन्या पूजन करते -
गंगापूर रोड येथील प्रसिद्ध तुळजाभवानी माता मंदिरात नवरात्र उत्सव काळात विविध धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात एक दिवस कन्या पूजनासाठी असतो. भाविक महिला मंदिरात आलेल्या लहान मुलींचे पूजन करून त्यांना भेटवस्तू, प्रसाद देत त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. दिवसभरात मंदिर परिसर शेकडो मुलींचे कन्या पूजन होत असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.
आशीर्वाद मिळतात -
नवरात्री काळात कन्या पूजनला विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात कधीही कन्यांचे पूजन केल्यास त्याचा लाभ मिळतो. आम्ही दरवर्षी न चुकता कन्या पूजन करतो. यात मुलींना हळद, कुंकु लावून त्यांना प्रसाद, फळ आणि उपयोगी भेटवस्तू देत असतो. कन्या पूजन केल्यास मुलींना आनंद होतो आणि त्या आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. तसेच आरोग्याची समस्या, आर्थिक समस्या, कामात अडचणी येणे या समस्या कन्यापूजन केलास दूर होतात असे महिला भक्त मेघा बुरकुले यांनी सांगितले.