नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी (आज) विधानपरिषद सभापतीची निवड केली जाणार आहे. भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड होणार आहे. त्यामागील राजकीय समीकरणे जाणून घेऊ.
विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपानं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी विधानपरिषदेत आज निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीनं विधानपरिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीकडं असलेलं संख्याबळ आणि विधानपरिषदेसाठी एकच अर्ज आला असल्यानं राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीसाठीची निवड निश्चित मानली जात आहे.
राम शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन- माजी मंत्री राम शिंदे हे मूळचे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील आहेत. ते 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले. यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता. अजित पवार यांनी सुद्धा, 'या मतदारसंघात एक सभा घेतली असती तर चित्र बदललं असतं' असं रोहित पवारांना उघडपणे सांगितल्यानं राम शिंदे नाराज झाले होते. परंतु आता नाराज राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदावर वर्णी लावून भाजपाकडून पुनर्वसन केलं जात आहे.
" महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक "
— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) December 17, 2024
---
सदर निवडणूकीसाठी मला अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री @narendramodi साहेब, देशाचे गृहमंत्री श्री @AmitShah साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री…
- धनगर समाजाला भाजपाकडे आकर्षित करणे- राम शिंदे हे धनगर समाजाचे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. याकरता राम शिंदे यांची सभापती पदी वर्णी लावण्यात येत आहे. धनगर समाजाला भाजपाकडं आकर्षित करण्यासाठी भाजपाची ही नवीन खेळी असल्याचं बोललं जातं आहे.
शिवसेनेला सभापती पदासाठी नकार- विधानपरिषदेच्या उपसभापती निर्मला गोऱ्हे यांनी सभापतीपद द्यावे, अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र, भाजपानं हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला. राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपल्यापासून विधानपरिषदेचे सभापती पद रिक्त होते. विधानसभेत भाजपाचा विधानसभा अध्यक्ष असताना विधानपरिषदेत शिवसेनेचा सभापती असावा, अशी मागणी शिवसेनेनं पक्षश्रेष्ठींकडे केली होती. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडं दुर्लक्ष करत भाजपानं विधानसभेच्या अध्यक्षपदासह विधानपरिषद सभापती पदसुद्धा आपल्याकडं ठेवलं आहे.
नीलम गोऱ्हे यांना दिलं होतं सभापती पदाचं आश्वासन- विधानपरिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांची विधानपरिषदेवर पुन्हा निवड झाली असली तरी त्यांना सभापती पदाची संधी मिळाली नाही. विधानपरिषदेचे कामकाज तेव्हापासून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या देखरेखेत सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधानपरिषदेच्या सभापती पदाचं आश्वासन दिलं होतं. याकरिता नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आल्याचं म्हटलं जाते. परंतु आता या पदावर भाजपाकडून राम शिंदे यांच्या नावाची वर्णी लागली असल्याकारणानं नीलम गोऱ्हे यांची अडचण झाली आहे.
राम शिंदे यांनी महायुतीच्या नेत्यासह पक्षाचे मानले आभार- राम शिंदे यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचं म्हटले आहे. आज सकाळी 10 वाजता राम शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.
हेही वाचा-