दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून पायी चालणेही मुश्किल झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी जऊळकेवणी, गोंडेगाव, खेडगाव, बोपेगाव, तिसगाव, शिंदवड परिसरातील स्थानिकांनी केली होती. बाजारसमितीने याची दखल घेत रस्तादुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या रस्त्यावर गाड्या चालविणे अंत्यत जिकिरीचे झाले असून अपघाताचे प्रमाण वाढले होते.
बाजारसमितीकडून दखल
वाहनचालक, शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यांनी याबाबत पिंपळगाव बाजार समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर बाजारसमितीने रस्त्याच्या दुरूस्तीबाबत दखल घेतली असून रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंदोलन करण्याची केली होती तयारी
रस्ता दुरूस्तीबाबत लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी व तोंडी स्वरूपात पाठपुरावा करूनही प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नसल्याने खेडगाव, जऊळकेवणी ,बोपेगाव, शिंदवड, सोनजांब परिसरातील वैतागलेल्या नागरिकांनी आंदोलन करण्याची तयारी केली होती. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरल्याने शेतकर्यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली होती. अतिशय महत्त्वाचा असणारा पिंपळगाव बाजारसमितीला जोडणारा हा रस्ता वाहतूक व बाजारपेठेच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
आरोग्यावर धुळीचा परिणाम
या रस्त्यावर टोमॅटो, द्राक्ष, कांदा या शेतमालाची दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. खराब रस्त्यामुळे वाहनांचे खोळंबा होऊन शेतमालाची प्रतही खराब होत होती. त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक फटका बसत आहे. हातातोंडाशी आलेला घास या धुळीने हिरावून घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यामुळे परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, याबाबत बाजार समितीने दुरूस्तीबाबत पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.