मनमाड (नाशिक) - मनमाड शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजपासून जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. काही ठिकाणी काटेकोर बंद पाळण्यात आला, तर अनेक ठिकाणी दुकाने सुरूच होते. लॉकडाऊन करून रुग्ण वाढणार नाही, याची खात्री कोण देईल? असा सूर सर्वसामान्य व्यापारी वर्गाकडून विचारला जात आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मनमाडमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहराला लॉकडाऊनची गरज असल्याची चर्चा होती. यासाठी व्यापारी वर्गाने आज (8 जुलै) ते 12 जूलैपर्यंत जनता कर्फ्यू पुकारला आहे. मात्र, शहरातील व्यापारी वर्गात देखील दोन गट पडले असून एका गटाने दुकाने बंद करण्यास विरोध केला आहे. काही भागात दुकाने सुरूच असल्याने जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दुकाने बंद करून कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही का? असा सवाल काही व्यापारी वर्गाने केला आहे, तर जनतेने काळजी घेतल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल, असेही काहींचे मत आहे. छोट्या व्यापाऱ्यांपेक्षा मोठ-मोठया दुकानात एकावेळी 50 च्या वर ग्राहक गर्दी करत आहेत. या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या सॅनिटायझसरचा देखील वापर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
मनमाडमध्ये अनेक दुकानं हे लॉकडाऊन काळात देखील सुरू होते. त्यास काही प्रमाणात पालिका प्रशासन देखील जबाबदार आहे. एकंदरीत आजपासून पुकारलेल्या जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील व्यापारी संघाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांना शहरातून दुकाने बंद करा, असे आवाहन करण्याची वेळ आली आहे.