नाशिक - विभागातील नाशिक, जळगाव, नगर जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज 200 ते 600 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे असून जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. तसेच शहरात कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामानाने, धुळे, नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे.
कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचे निर्देश -
गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून राज्य सरकारने कोरोनाबाबतचे निर्बंध अधिक कडक केले आहे. नाशिक विभागातदेखील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांत कोरोना प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच सर्वच ठिकाणी नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वच ठिकाणचे कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात सर्वधिक रुग्ण -
नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात दररोज 200 ते 600 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाशिकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धुळ्यात मास्क न वापरणाऱ्यांची संख्या अधिक -
धुळे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण वाढ होत असल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे धुळे शहरातील आहे. धुळ्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर केली जात असली, तरी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता जिल्हाधिकारी यांना कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट -
जळगाव शहर, अमळनेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर चोपडा या तालुक्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जळगावमध्ये गेल्या आठ दिवसांत तब्बल 841 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढल्या संसर्गाचा नागरिकांचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. बाजारपेठेतील अनियंत्रित गर्दी, लग्नसमारंभ, राजकीय सभा, मेळावे आदी कार्यक्रमात नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तसेच अनेक बेशिस्त नागरिक विनामास्क वावरतांना दिसून येत आहे.
नंदुरबारमध्ये कोरोना नियंत्रणात -
नाशिक, नगर, जळगावच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. गेल्या आठ दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात 50 ते 60 नवीन रुग्णांची भर पडत आहे. शहादा तालुक्यातील करणखेड या गावी 23 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
नगरमध्ये कोरोनाचे कडक निर्बंध -
नाशिक पाठोपाठ नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने रात्रीची संचारबंदी, तर दिवसा जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. नगरमध्ये दिवसाला 100 ते 125 नवीन रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने लग्न समारंभ तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमात 50 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील हॉटेल, फूड कोर्टस, बार रेस्टॉरंट आदी ठिकाणी आसन व्यवस्थेच्या 50 टक्के ग्राहकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालयात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा - ग्रामीण भागाला दिलासा! ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या परवानगीची अट शिथील