नाशिक - सिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटे येथे कोरोनामुळे शेळके कुटुंबियांच्या घरातील 5 व्यक्तींचा 10 दिवसात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, याच गावातील आव्हाड कुटुंबातील तिघेजण दगावल्याचीही घटना घडली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटे येथील बाबूराव शिवराम शेळके यांना बहिणीकडे जाऊन आल्यानंतर कोरोना झाला होता. त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अशातच घरातील आणखी 4 जणांना कोरोनाची लक्षणे दिसली. त्यामुळे त्यातील दोघांना नाशिक येथे तर एकाला संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बाबूराव शेळके (वय 75) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर 2 दिवसांनी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई शेळके (वय 70) यांचादेखील मृत्यू झाला. या धक्क्यातून शेळके कुटुंब सावरत नाही तोच लक्ष्मी यांचा मुलगा सुरेश (वय 58) व रमेश (वय 52) यांनीदेखील अखेरचा श्वास घेतला. तीन दिवसाच्या आत एका पाठोपाठ एक असे 4 मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच या दुःखात आणखी भर पडली. रमेश शेळके यांचा मुलगा सचिन शेळके (वय 30) याचादेखील मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील 5 जण 10 दिवसांमध्ये गेल्याने नांदूर-शिंगोटेमधून हळहळ व्यक्त होत आहे.
शेळकेंच्या बहिणीचाही मृत्यू
तर, बाबूराव शेळके यांची इंदापूर येथील बहीण सुनंदा आव्हाड यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर विवारी गावात शोकाकुल वातावरणात सामुहिक दशक्रिया विधी पार पडला. त्यामुळे शेळके आणि आव्हाड कुटुंबावर खूप मोठा दुःचा डोंगर कोसळला आहे.
आणखी एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू
दरम्यान, या घटनेतून नांदूर-शिंगोटे गाव सावरत नाही तोच याच गावातील आव्हाड कुटुंबातील महादू आव्हाड, भिमुबाई आव्हाड, पांडुरंग आव्हाड यांचादेखील 3 दिवसाच्या आत कोरोनामुळे मृत्यू झाला. 10 दिवसात कोरोनामुळे 2 कुटुंबं उद्ध्वस्त झाली. त्यामुळे गावातील नागरिक हादरुन गेले आहेत.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरवात