नाशिक - मालेगाव तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या दाभाडी शाखेतून शेकडो खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये परस्पर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकमित्र गणेश सोनवणेला अटक करण्यात आली आहे.
दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत दाभाडीसह पाटणे, जळगाव, पिंपळगाव, रावळगाव आदी गावांसह अनेक शेतकरी, नोकरदारवर्ग तसेच शासकीय योजनांची खाती आहेत. या बँकेतील बीसी एजंट गणेश सोनवणे बँकमित्र म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत होता. त्याला बँकेतर्फे छोट्या रकमांचे व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आले होते. गणेशने मागील काळात खातेदारांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास संपादन केला होता. त्याचा फायदा उठवत गणेशने बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपयांची रक्कम काढल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून खातेदारांच्या तक्रारीवरून चौकशी चालू असताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम परस्पर खात्यावरून काढत असल्याचे जाणवले. याबाबत बँक अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत पुढील कारवाईसाठी कळवले. तोपर्यंत बँक कर्मचाऱ्यांकडून गणेशला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. ज्या खातेदारांची एसएमएस सुविधा नाही, तसेच अशिक्षित खातेदार जे अनेक दिवसांपासून बँकेचे व्यवहार करत नाहीत, अशांच्या खात्यातून स्लिपवर खोट्या सह्या करत, अशिक्षित लोकांकडून थम मशिनच्या साह्याने तसेच खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी येणाऱ्या खातेदारांना पावती शिक्का मारून रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेण्यात आली आहे.
बँकेतील अपहाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याने नाशिकहून वरिष्ठ अधिकारी विजय राऊत यांनी आपल्या टीमसह दिवसभरात खातेदारांच्या पासबुक प्रिंट करून तक्रारी अर्ज दाखल करून घेतले. त्यानंतर मालेगाव छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाभाडीसह परिसरातील अपहाराची बातमी पसरल्याने शेकडो खातेदारांनी दिवसभर बँकेला घेराव घातला होता.