नाशिक - जिल्ह्यात पावसाचा वेग कायम आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आता इगतपुरी तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना तडे जाण्याच्या घटना समोर येत आहेत.
जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी एका दिवसात 368 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ह्या मोसमात आतापर्यंत इगतपुरी तालुक्यामध्ये 1062 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्याला तडे जाण्याच्या घटना समोर येत आहेत, कसारा घाटात रस्त्याला तडे गेल्यानंतर आता इगतपुरी सिन्नर अकोले तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता खचला आहे. म्हैसवळण घाटात रस्ता खचला असून, अनियमित काळासाठी ह्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच ह्या रस्त्यावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली असून यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
पावसाळ्यापूर्वी ह्या रस्त्यांची डागडुजी होणे गरजेचे होते, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात रस्ते खचल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.