नाशिक - उपमुख्यमंत्री पदासाठी मी इच्छुक नसून, याबाबत आत्ताच बोलणे योग्य नसल्याचे वक्तव्य शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले. तसेच शिवसेनेत कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
सुभाष देसाई अंबड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमाक केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, की शिवसेनेत कोणतीही गटबाजी नसून मी उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही. उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, देसाई यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे सेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, नाशिकमध्ये सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा १६ तारखेला अयोध्येला जाणार आहेत. त्याठिकाणी ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येत लवकर राम मंदिर व्हावे, अशी भारतातल्या हिंदूंची इच्छा आहे. हे स्वप्न लवकर पूर्ण होईल असेही सुभाष देसाई यावेळी म्हणाले.