सटाणा (नाशिक)- पत्नी चार वर्षांच्या मुलाला सोडून मित्राबरोबर घर सोडून निघून गेल्याने निराश झालेल्या पतीने फेसबुकवर चिठ्ठी पोस्ट करून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आपल्या पत्नीस व तिच्या मित्राला शिक्षा करावी, अशी पतीने चिट्ठीत मागणी केली आहे. राहुल चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
उमराणे (ता. देवळा) येथील राहुल चव्हाण (पाटील) हा पदवीधर युवक अॅपे ही मालवाहू रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या घरी आई, पत्नी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. तो सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय होता. त्याची पत्नी पूजा काही दिवसांपूर्वी आपल्या 4 वर्षांच्या मुलास सोडून एका युवकासोबत पळून गेली होती. त्यामुळे गेले चार दिवस राहुल अत्यंत खचला होता.
या घटनेमुळे समाजात काय चर्चा होईल? लोक काय म्हणतील, या विचाराने तो घराबाहेरदेखील पडला नव्हता. त्याच्या मनातील ही घालमेल कोणालाच कळली नाही. या तणावातच त्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ती फेसबुकवर पोस्ट केली. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. अनेकांना त्याने खरेच आत्महत्या केली की गंमत केली, याची शंका आली. घरी चौकशी केल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान, परिसरात अत्यंत मनमिळाऊ व सगळ्यांशी हास्यविनोद करणाऱ्या राहुलने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राहुलने चिठ्ठीत लिहिलेला मजकूर असा:
मी गेले 4 दिवस खूप मानसिक तणावातून जात आहे. माझी पत्नी पूजा शनिवारी घरातून निघून गेली. मुंगसे येथील कल्पेश सूर्यवंशी हा आमिष दाखवून तिला घेऊन गेला आहे. त्यामुळे मी एवढे दिवस कमावलेली इज्जत पत्नी मातीत मिळवून निघून गेली. तिने जाताना माझ्या 4 वर्षांच्या मुलाचादेखील विचार केला नाही. त्यामुळे आता मला समाजात, नातेवाईकात तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. हा जो काही प्रकार म्हणजे तू आणि तो कल्पेश मुन्ना पूर्वीच घरात सापडले होते. त्यातले मला काहीही माहीत नव्हते. हे जर मला माहीत असते, तर मी हे प्रेम कधीच होऊ दिले नसते. आता मी आत्महत्या करतो आहे. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पूजा आणि कल्पेश आहे. मला तिची गरज नाही, पण मला माझ्या इज्जतीची गरज आहे. पोलीस प्रशासनाला मला एवढेच सांगणे आहे, की त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी.