नाशिक - शहरातील जेलरोड भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रभान जाधव (वय ४१, रा. लाखलगाव) असे मृत पतीचे नाव आहे.
चंद्रभान अशोक जाधव (वय ४१) हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच १५ एफ.वाय ७२०३) पत्नीसोबत प्रेसरोड, कन्या शाळेकडून रस्ता ओलांडत जेलरोडकडे जात होते. त्यावेळी जेलरोडकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०४ डी.एस ३५१४) जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत ट्रकचे चाक जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालक शेख हसन भिकन (रा. सिन्नर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जेलरोड रस्त्यावर शाळा, प्रेस, असल्याने हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, तरी देखील अवजड वाहने कोणालाही न घाबरता या रस्त्याने वाहतूक करतात. या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करावी या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
हेही वाचा- नाशिक जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल- जिल्हाधिकारी