येवला ( नाशिक ) - आधी कोरोनाचे संकट आणि नंतर पावसामुळे आलेल्या नैसर्गिक संकटात बळीराजा सापडला असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. शेकडो हेक्टरवरील पिक आजही पाण्याखाली असल्याचे चित्र येवला तालुक्यात पहावयास मिळत आहे.
येवला तालुक्यातील पिंप्री येथील पुंडलिक बोरणारे यांनी दोन एकरात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र अतिवृष्टीत त्यांचे संपूर्ण सोयाबीन पाण्यात असल्याने पूर्ण पीक खराब होऊ लागले आहे. शेंगांमधील दाणे पुन्हा ओलसर पडू लागले आहेत, अशाही परिस्थितीत त्यांनी मजूर लावून पीक वाचविण्यासाठी धडपड सुरु केली असून त्यातून जेवढे पीक हाती लागेल तेवढे वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे, काढणी केलेले सोयाबीन काळे पडण्याचा धोका असून तसे झाल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.