नाशिक - शहरामध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ८ दिवसांच्या लहान मुलाचा गंगापूररोड येथील साफल्य रुग्णालयामध्ये उपचारादम्यान मृत्यू झाला. मात्र, बील देण्याची कुवत नसल्याने बाळाचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिला आहे. मुलाच्या वडिलांनी नंतर पैसे देतो परंतु, आमचं बाळ ताब्यात द्या, अशी विनवणी रुग्णालयाकडे केली. मात्र त्याला प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही.
२ मार्च रोजी संजय अहिरे यांच्या लहान मुलाला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे बाळाला प्रथम त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र व्हेंटीलेटर खाली नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मित्राच्या सल्ल्याने त्यांनी गंगापूररोड येथील साफल्य रुग्णालयामध्ये २ तारखेला बाळाला दाखल केले. बाळाची प्रकृती सुधारत आहे, असे वारंवार डॉक्टर सांगत होते. परंतु, खर्च परवडणार नसल्याने दुसऱ्या एखाद्या रुग्णालयात जाण्याचे देखील त्यांनी रुग्णालयाला सांगितले. मात्र, त्याच दिवशी रात्री २ वाजता डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगताच कुटुंबीयांना धक्का बसला. बाळाचा मृत्यू हा आधीच झाला असावा. मात्र, जास्त पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांनी याबाबत उशिरा माहिती दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
रुग्णालयाच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.