नाशिक - इगतपुरी तालुक्यात गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहे. भावली धरण शंभर टक्के भरले असून दारणा धरण ८९ टक्के भरले आहे. पावसाची संततधार सुरुच असून दारणा धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून आज १२ हजार ९९२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
अस्वलीच्या लष्करी हद्दीतही संततधार पावसाने मूकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंड-ओहोळ नदीलाही पूर आला आहेत. त्यातच दारणाचा विसर्ग सोडल्यामुळे दारणापात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे. दारणा नदीला महानदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग चौथ्या दिवशीही इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे येथील धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.