नाशिक - राज्यात सध्या २५ हजार ९२२ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असून, ५ हजार ५०० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील मृत्युदरही अटोक्यात आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातही रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी असून कर्तव्य बजावणारे पोलिसही लवकरच यातून बरे होतील. मालेगाव मध्येही काही प्रमाणावर परिस्थितीत अटोक्यात असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले.
कोरोनावर मात करण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आयुषचे डॉ. कोहली आणि डॉ. खोलप यांच्या माध्यमातून युनानी, होमिओपॅथी व आयुर्वेद या तिघांचे एकत्रीकरण करुन आयुष मंत्रालयाने एक समिती तयार केली आहे. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन केले तर निश्चितच त्याचा फायदा होईल असे मत डॉ. टोपे यांनी व्यक्त केले.
मालेगावातील एकही रुग्ण व्हेंटीलेटरवर नाही -
मालेगावातील रूग्ण संख्या जास्त आहे मात्र, येथील रूग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. येथील एकाही रुग्णाला अद्याप व्हेंटीलेटर लावण्याची आवश्यकता भासली नाही. कोरोनावर मात करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असून सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही टोपेंनी केले.
मालेगाव शहरातील अधिग्रहीत रुग्णालयात सध्या २० ते २५ टक्के रुग्ण आहेत. तसेच खासगी रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मालेगावात टेलिमेडिसीन आणि टेली रेडिओग्राफी दोन दिवसात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच स्थानिकांच्या मागणीनुसार मालेगावातील हज हाऊस अधिग्रहीत करण्यात आले आहे. येथील कोविड-१९ लॅबला किट्सचा नियमित पुरवठा करण्यात येणार असल्याचेही डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले.