नाशिक - जुने नाशिक गावठाण भागातील संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा सकाळी कोसळला. त्यात ४ जण अडकले होते. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेतली आणि सर्वांची सुटका केली. दरम्यान, त्यातील ३ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक शहरात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्री ही पावसाची संततधार सुरू होती. तर शुक्रवारी सकाळी देखील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील धोकादायक वाड्यांना महानगरपालिकेने या अगोदरच नोटिसा बजावल्या होत्या. जे नागरिक वाडे दुरुस्त करणार नाहीत त्यांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येईल आणि धोकादायक भाग पाडण्यात येईल, असा इशारा देखील महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला.
काही महिन्यांपूर्वी तांबड लेन भागात वाडा पडून त्यात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महानगरपालिकेने धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, वाड्यात वर्षानुवर्षे राहणारे भाडेकरी आणि घरमालक यांच्या वादामुळे अनेक ठिकाणी वाड्यांची पुनर्बांधणी थांबली आहे.