नाशिक - शीख धर्मीयांचे संस्थापक संत गुरुनानक यांची 550 वी जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सातनाम वाहेगुरूंचा जयघोष करीत निघालेल्या या नगर कीर्तन यात्रेत पंचप्यारे, पंचनिशाण तसेच सुशोभित चित्ररथात गुरू ग्रंथ साहेब तर दुसऱ्या चित्ररथात शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच अश्वधारी शीख बांधवांसह देशभरातून आलेले शीख बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते.
हेही वाचा- व्यवसाय विश्वास निर्देशांकात १५ टक्क्यांची घसरण; एनसीएईआर सर्व्हे
गुगुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शीख धर्मियांच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. छोटा गुरुद्वारा येथे कालपासून धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यात प्रामुख्याने प्रवचन, किर्तन असे कार्यक्रम होते. तर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी सर्वधर्मसमभाव म्हणून शहरातील सर्व धर्माचे धर्मगुरू यांना बोलावून त्यांचा गुरुद्वारा प्रबंधक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाबाजीने सर्वधर्म यावर व्याख्यान दिले. यावेळी शहरातील सर्व धर्मीय बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी देखील उपस्थित होते.