नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे वास्तव यावेळी मंत्र्यांसमोर आले. महाजन यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पांगरी गावातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना सामोरे जावे लागले. चारा आणि पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दुष्काळ दौऱ्याला अधिकारी येत नसल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
आचारसंहितेच्या नावाखाली अधिकारी जास्त बाऊ करत असल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला. या संदर्भात निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करून दुष्काळ दौर्यात अधिकाऱ्यांना हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.
आज सिन्नर तालुक्याचा दौरा केला आहे. मात्र या दौऱ्याला प्रांत तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना सूचना देणे कठीण जात आहे. दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना थेट सूचना करता येत नसल्याची माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आहेत. चारा आणि पाणी दिल्याने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर काही फरक पडेल असे मला वाटत नाही, असेही महाजन यांनी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगत आचार संहिता शिथिल करण्याचे सांगितले. मात्र दोन दिवसानंतर फक्त पाण्यासंदर्भात अधिकारी निर्णय घेतील असे उत्तर निवडणूक आयोगाकडून आल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत देणे अवघड होत असून, दुष्काळी भागातील जनतेच्या असंतोषाला देखील सामोरे जावे लागत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे.