नाशिक - जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 1 लाख 25 हजार बालके बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यातील 95 टक्के बालके घरीच होम क्वांरटाइन होऊन बरे होतील, तर 5 टक्के बालकांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे लागेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यासाठी बाराशेहून अधिक बेडची तयारी करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली, कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनतंर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे, मात्र तरी देखील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अशात आता प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नाशिक जिल्ह्यात सुमार 1 लाख 25 हजार बालकं कोरोनाबाधित होऊ शकतात. पण त्यातील जेमतेम पाच टक्के बालकांना वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागू शकते असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स
तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा बालकांना असल्याचा आंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत नाशिक शहरातील खासगी हॉस्पिटल 450, शासकीय बिटको हॉस्पिटल 100, ग्रामीण हॉस्पिटल 350, कोविड सेंटर 300 अशी बालकांसाठी 1200 बेडची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हाभर ऑक्सिजन प्लांटची सोय केली आहे. 100 टन ऑक्सिजन निर्मितीची जिल्ह्याची क्षमता आहे. त्यातील 60 टन ऑक्सिजन हा सरकारी रुग्णालयातच तयार होणार आहे, अशी माहिती देखील यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा - अदानी ग्रुपच्या तिन्ही कंपन्यांची खाती गोठविल्याचे रिपोर्ट दिशाभूल करणारे- गौतम अदानी