नाशिक – कोरोनामुळे यंदा लग्न ठरलेल्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक नियमांचे पालन करत व साधेपणाने बोहल्यावर चढत आहेत. असाच एक आगळा-वेगळा विवाह समारंभ नाशिकच्या गंगापूरमध्ये संपन्न झाला.
लग्नातील झगमगाट व भव्य सोहळ्याला फाटा देत नाशिकच्या गंगापूर रोड भागात पेशाने वकील असणारे अनुराग पटवर्धन आणि शिक्षिका मोनालिसा बुरकुले यांचा विवाह सोहळा बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये 25 ते 30 लोकांच्या उपस्थित शारीरिक अंतर ठेवत पार पडला. विशेष म्हणजे या लग्नाला व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून देशातील तसेच परदेशात असलेल्या नातेवाईकांनी हजेरी लावत नव वधू-वराला आशीर्वाद देत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-videocallmarriageattendance-7204957_19052020185404_1905f_1589894644_849.jpg)
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-videocallmarriageattendance-7204957_19052020185404_1905f_1589894644_910.jpg)
यावेळी वधू-वरासह उपस्थित नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिगसह वारंवार सॅनिटाझरचा वापर केला. यावेळी जवळच्या नातेवाइकांनी अनुराग आणि मोनालिसा यांच्या लग्न सोहळ्यास व्हाटसअप व्हिडिओ माध्यमातून सर्व लग्न विधी कार्यक्रमात सहभाग नोंदवत नव वधु वारास शुभेच्छा दिल्या.
पाठवणीचा व्हिडिओ अन् नवरीसह नातेवाईक भावूक...
बुरकुले परिवारातील मोनालिसा हिचे शेवटचं लग्न कार्य असल्याने त्यांचे जवळचे नातेवाईकांनी देश विदेशातून येण्याचे नियोजन चार महिन्यापूर्वी केलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत असलेली वाहतूक बंद असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मात्र तरी देखील सर्व नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून लग्नाला हजेरी लावली. बिदाईच्या वेळी व्हिडिओ कॉलवर असलेल्या मावश्या, भाऊ, बहिणी यांनी अश्रूंना वाट करून देत मोनालिसाला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.